Ad will apear here
Next
जायफळ, रान-जायफळ, मायाफल (किंवा माजूफल), कायफळ
काल ‘मायफळ’ संदर्भात लिहिलेल्या लेखावर टिपणी करताना काही अभ्यासकांनी वरील मराठी नावातील वनस्पतींची शास्त्रीय नावे आणि स्थानिक नावे तसेच त्यांचे गुणधर्म याविषयी प्रश्न उपस्थित केले होते. काही मान्यवरांनी मी चुकीची माहिती दिली असल्याचा आरोपही केला. त्यामुळे हा विषय मला अधिक रुचकर वाटला! मी यात आणखीन खोलात शिरलो. बाजारात वरील नावांनी मिळत असलेली उत्पादने, मूळ झाडांची शास्त्रीय नावे, स्थानिक नावे आणि त्यांचा परस्पर संबंध याच्या शोधमोहीमेवर! या शोधात जी काही नवीन माहिती समोर आली ती वाचकांसमोर थोडक्यात मांडत आहे. माहिती वाचून वाचकांनीदेखील लगेच निष्कर्षावर येऊ नये एवढीच विनंती. आणखीन चर्चा करावी. मुद्दे मांडावेत. काही फोटो अभ्यासाअंती इंटरनेटवरून डाउनलोड करून येथे देत आहे. कुणाजवळ अन्य माहिती, फोटो असतील तर तेही शेअर करावेत. वरील प्रत्येक झाडाची सविस्तर माहिती मी येथे दिलेली नसून केवळ फरक अथवा साम्य लक्षात घेणे एवढाच उद्देश आहे.

१. जायफळ (Myristica fragrans Houtt.; Family: Myristicaceae)
घरगुती मसाल्यातील सर्वांच्या परिचित असलेले हे फळ मुळात इंडोनेशियातील मोलक्कस द्वीप-समूहांतील अम्बोन आणि बांडा बेटांवरील आहे. त्यामुळे डॉ. वा. ग. देसाई यांच्या १९२७ साली प्रकाशित झालेल्या ‘औषधी संग्रह’ या पुस्तकात यास ‘बांडा जायफळ’ असे नाव आहे. संस्कृतमध्ये यास ‘जातीफल’ म्हणतात. जायपत्री याचीच असते. सध्या दक्षिण भारत आणि कोकण प्रदेशात याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

जायफळ

२. रान-जायफळ (Myristica malabarica Lam.; Family: Myristicaceae)
‘औषधी संग्रह’ या पुस्तकात याचा उल्लेख ‘रान-जायफळ’ किंवा ‘रामफळ’ असा असला तरी कोकणात याची झाडे असलेले शेतकरी, देवराईसंबंधी माहिती असलेली जुनी वयस्कर मंडळी, ही फळे खरेदी करणारी मंडळी, कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, गोवा येथील ‘तटीय कृषि संशोधन संस्थान’ येथील शास्त्रज्ञ या झाडास ‘मायफळ’ असेच संबोधतात. याची रोपे सध्या सर्रास जायफळाची कलमे बांधण्यासाठी वापरली जातात. मी याच मायफळाबद्दल सविस्तर पोस्ट लिहिली होती. (लिंक: https://www.facebook.com/mdpatil123/posts/895422044260593) या पोस्टमध्ये मी जायफळाच्या तीन सख्ख्या भावंडांचा उल्लेख केला होता. ही झाडे अनुक्रमे १. Myristica malabarica, २. Myristica dactyloides आणि ३. Myristica fatua var. Magnifera आहेत. सह्याद्रीतील हे तीनही वृक्ष अति दुर्मिळ प्रकारातील आहेत. तळकोकणात क्रमांक २ आणि क्रमंक ३ च्या वापराबद्दल खात्रीलायक माहिती मला उपलब्ध होऊ शकली नाही. कुणास माहिती असेल तर चर्चा करावी. डॉ. देसाई यांनी हे फळ जायफळा प्रमाणेच वापरले जात असल्याचे नमूद केले आहे तसेच याच्या औषधी गुणधर्माबद्दल सांगितले आहे. या मायफळाच्या पत्रीस ‘रामपत्री’ म्हणतात.

रान-जायफळ

३. मायाफल किंवा माजुफल Quercus infectoria G.Olivier; Family: Fagaceae)
सध्या बाजारात गोल काहीसे ओबडधोबड टोके टोके असलेले जे मिळते ते हेच. मात्र हे फळ नाही. ओक झाडाच्या कोवळ्या फांद्यांवर काही कीटक (gall wasps) खोल जखम करून अंडी देण्यासाठी जागा तयार करतात. मग हे झाड ही जखम भरून काढण्यासाठी पेशींची वाढ करीत जाते. यातूनच हे गोट्यांच्या आकाराचे घरटे तयार होते. कीटक बाहेर येण्यापुर्वीच या गोलसर गाठी काढल्या जातात. याची बाजारात मायाफल किंवा माजुफळ म्हणून विक्री होते. याच्या गोलाईत, खडबडीत पणात, टोके आणि उंचावट्यांत खूप जास्त विविधता असते. काही तर गोलच असतात. वस्तवात याचा ‘फळ’ या संज्ञेशी काही संबंध नाही! ओकची फळे झाडास वेगळी लागतात. मुळात ‘माया-फल’ असा संस्कृत शब्द असून हिंदी मध्ये यास ‘माजुफल’ म्हणतात. मायाफलचे मराठीत 'मायफळ' झाले असावे. डॉ. देसाई यांनी या कीटकांच्या घरट्याचे सविस्तर औषधी गुणधर्म पुस्तकात दिले आहेत. ओक वृक्षाची ही प्रजाती दक्षिण युरोपातील ग्रीस, इराक, इराण, सायप्रस, लेबनॉन, सायरिया देशांत आढळते. हा मुळात भारतीय वृक्ष नाही. चरक-संहीतेत याचा उल्लेख मला आढळून आला नाही. कदाचित नजरचुकीमुळे असेल. पण चरक-संहीतेचा कुणी सखोल अभ्यास केला असेल तर मलाही चर्चा करण्यास आवडेल.

मायाफल किंवा माजुफल

४. कायफळ (Myrica esculenta Buch.-Ham. ex D.Don. Syn: Myrica nagi Thunb.; Family: Myricaceae)
संस्कृतमध्ये यास ‘कट्फल’ असे म्हणतात. तर हिंदीत ‘काफल’ म्हणतात. याचे मराठीत ‘कायफळ’ झाले. हे एक सदाहरित छोटेखानी झाड असून उत्तर भारतात हिमालयाच्या दक्षिणेस आढळते. याचीही मोठी गंमत आहे. बाजारात कायफळ या नावाने जे मिळते तेदेखील फळ नाही. ही या झाडाची साल आहे. साल पाण्यात टाकल्यास पाणी लालसर होते. याच्या सालीचे (म्हणजेच कायफळाचे) अनेक औषधी गुणधर्म आणि उपयोग डॉ. देसाई यांनी सविस्तर दिले आहेत. या झाडास छोटी गोलसर लाल फळे लागतात. उत्तराखंड हिमाचल वगैरे भागात रस्त्याकडेस ही ताजी लालबुंद फळे शंभर-दीडशे रुपये किलोपर्यंत विकली जातात.

कायफळ

तर असा हा सगळा विषय आहे. आता एक तर नक्की झाले की कायफळ आणि मायाफल किंवा माजूफल सह्याद्री प्रदेशातील वृक्ष नाहीत. जायफळदेखील मुळात सह्याद्रीतील नाही. राहिला प्रश्न रान-जायफळ किंवा आम्ही ज्याला कोकणात ‘मायफळ’ म्हणतो त्याचा. या मायफळाची रामपात्री आणि बीचे औषधी गुणधर्म आणि उपयोग तळकोकणात प्रचलित आहेत. याचे मार्केटदेखील उपलब्ध आहे. सह्याद्रीतील स्थानिक दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन आणि त्याला अर्थकारणाची जोड देत येथील सामान्य शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणे हा माझा स्वार्थ. त्यामुळे मराठी नाव, हिंदी नाव आणि उच्चार किंवा बाजारातील नावे यावर मुत्सदी आणि विद्वान अभ्यासक मंडळींनी सुयोग्य व्यासपीठावर चर्चा करून नामकरण ‘विधी’मधील गुंता मोकळा करावा एवढीच विनंती!

- मिलिंद पाटील (सिंधुदुर्ग)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYGJCO
Similar Posts
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
आम्हा मेंढरांस ठावे.. जहाजाचा कप्तान इतर सगळ्यांच्या मानानं धिप्पाड, उंचापुरा होता. पण त्याला थोडं कमी ऐकू यायचं आणि दूरवरचं दिसायचं नाही. आपल्या अधू दृष्टीला झेपेल इतकंच त्याला जहाज चालवण्याचं ज्ञान होतं.
‘भिकेडोंगरी’चो भेळो डोंगर चढायला सुरुवात झाली, गर्द झाडीतून, बांबूच्या बनातून वाट काढत आम्ही चालू लागलो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. खरंच, केवढा असेल न हा वृक्ष. भेळो, अर्थात बेहडा Terminalia bellirica (Gaertn.) Roxb. Family: Combretaceae संस्कृत मध्ये याला ‘बिभीतक’ किंवा ‘अक्ष’ असेही नाव आहे.
सातवीण - Alstonia scholaris (L.) R. Br. कोकणात दिवाळीत ‘चावदिसाक’ सकाळी तुळशी वृंदावनासमोर ‘गोविंदा ss, गोविंदा sss, गोssविंदा..’ म्हणंत हिरव्या गार बुळबुळीत कारीट्याचा वध करून गोड-धोड खाण्याची इच्छा घेऊन घरात जाल तर आज्जी पेल्यात एक अत्यंत कडू करड्या रंगाचा विचित्र रस घेऊन वाटेत उभी असायची. मग या पेल्यातील एक तरी घोट घेतल्याशिवाय गत्यंतर नसायचं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language